वणी | प्रतिनिधी
यंदाच्या खरीप हंगामात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी, पांढरकवडा यांना निवेदन देऊन बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीनची पेरणी केली. मात्र, काही कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. विशेषतः बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि. कंपनीच्या 'हुतुतू' या सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. परिणामी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून अतिरिक्त खर्चाचा मोठा बोजा पडला आहे.
मनसेने कृषी विभागाकडे संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने पंचनामे करून बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत तसेच बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात पुढील दोन ते तीन दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी फाल्गुन गोहोकार यांच्यासह गोविंदजी थेरे, संजय गौरकर, आशिष ठावरी, सोमेश्वर ढवस, धीरज पेचे, मनोज उरकुडे, सुमित ठेंगणे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.