वणी :
नांदेपेरा गावातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. २१ जुलै) ग्रामस्थांनी शांततापूर्ण चक्काजाम आंदोलन छेडले. या आंदोलनातून वाढत्या अपघातांचा धोका, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि वाहतुकीच्या कोंडीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
आंदोलनाची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदूरकर तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अवजड वाहनांमुळे गावातील मुख्य रस्त्यावर निर्माण होणारी धोकादायक परिस्थिती, शाळकरी विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या मागण्या गांभीर्याने घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले. त्यानंतर शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात राहुल मुंजेकर, शुभम गोरे (युवासेना लोकसभा समन्वयक), राहुल पारखी, रोहन पारखी, कपिल कुंटलवार, अमृत पुरी, राजू खामणकर, गणेश लांडगे, प्रज्योत ठावरी, निलेश हेपट यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.
शांततेच्या मार्गाने पार पडलेल्या या आंदोलनानंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करून नांदेपेरा गावातील अवजड वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.