वणी रेल्वे स्थानकावरील मोफत जलसेवा उपक्रमाचा समारोप; स्वयंसेवकांचा गौरव, ● श्री महावीर बहुउद्देशीय संस्थेच्या सेवाभावी कार्याचे मान्यवरांकडून कौतुक

वणी :

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत रेल्वे प्रवाशांची तहान भागविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून वणी रेल्वे स्थानकावर श्री महावीर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत जलसेवा उपक्रमाचा समारोप व स्वयंसेवक सत्कार सोहळा शुक्रवारी रात्री स्थानिक बाजोरिया हॉल येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी जलसेवेत निस्वार्थ योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक भंडारी होते, तर माजी आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नगर परिषद आरोग्य समितीचे सभापती अनिल चिंदालिया, श्री संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र मेहता, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक राहुल खापणे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक रितेश कुमार तसेच वणी रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक रितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे सदस्य दीपक छाजेड यांनी मोफत जलसेवा उपक्रमाची माहिती देत गेल्या तीन वर्षांपासून उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांसाठी सातत्याने सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचा आढावा घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेल्वे प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या या मानवतावादी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. समाजात सेवाभावाची प्रेरणा देणारा हा उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उन्हाळाभर रेल्वे स्थानकावर पाणी वाटप करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
समारोपप्रसंगी संस्थेचे जितेंद्र कोठारी यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, जलसेवेला सहकार्य करणारे देणगीदार, स्वयंसेवक, रेल्वे प्रशासन, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारे गोकुळ ॲक्वाचे संचालक विनोद भागडे तसेच कार्यक्रमासाठी मोफत सभागृह उपलब्ध करून देणारे बाजोरिया लॉन्सचे संचालक विनोद बाजोरिया यांचे आभार मानले. भविष्यातही अधिक उत्साहाने मोफत जलसेवा उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अशोक भंडारी, दीपक छाजेड, मनोज बोहरा, पंकज भंडारी, जितेंद्र कोठारी, संदीप बोथरा, धीरज सुराणा, नितीन बाफना, दिलीप कोचेटा, अजय छल्लानी, श्याम लहरिया, जमनादास कोठारी, विनीत बाजोरिया, बबलू बोथरा, महंमद शेख, अजय महागडे, पवन जैस्वाल, विनोद भागडे, वसंता दानव, विलास कालेर, विजय बल्की, संजय सोनटक्के, महादेव पिदुरकर, सुभाष कोनेप्रतिवार, पुंडलिक बोरुळे, शंकर चांदेकर, नमन भंडारी, मीत बोहरा, डॉ. किशोर कोंडावार यांच्यासह संस्थेचे सदस्य, स्वयंसेवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर, स्वयंसेवक, संस्थेचे पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post