जिल्हा परिषदेचा रस्ता गेला चोरी?; प्रशासन झोपेत, मनसेची कार्यवाहीची मागणी

वणी :

शिवणी ते मुंगोली (इ. २४३) हा जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा सार्वजनिक रस्ता वेकोलि (WCL) प्रशासनाने बेकायदेशीरपणे बंद करून त्या ठिकाणी मोठा नाला खोदल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकाराकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मनसेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, दोन दिवसांत रस्ता पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मनसेने जिल्हा परिषद उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या निवेदनानुसार, शिवणी–मुंगोली हा रस्ता अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. मात्र, WCL प्रशासनाने हा रस्ता गिळंकृत करून तो पूर्णपणे बंद केला असून, त्याठिकाणी मोठा नाला खोदण्यात आला आहे.
या चुकीच्या नियोजनामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी थेट शिवणी व परिसरातील गावांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला असून, गावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एवढे गंभीर संकट निर्माण होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याबद्दल मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सार्वजनिक रस्ता बेकायदेशीरपणे बंद होत असताना आणि नियमांची पायमल्ली होत असतानाही प्रशासनाने मौन बाळगल्याचा आरोप करत, संबंधित शासकीय अधिकारी तसेच WCL मधील दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसांत खोदलेला भाग पूर्ववत करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अन्यथा संबंधित अधिकारी व कंत्राटदारांविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासन आणि WCL व्यवस्थापनाची राहील, असा इशाराही मनसेने दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, WCL वणी एरियाचे मुख्य महाप्रबंधक तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यासह धीरज पिदूरकर, रणजित बोन्डे, मारोती बोटपेले, महेश कुचणकर, सचिन बोरडे, भोला चिकनकर, सुरज काकडे, अनिल वासेकार, धीरज बगवा, प्रदीप बदकल, मंगेश येटे, राहुल काळे, उत्तम इसनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post