वणी:
वणीत एका पत्रकारासह दोघांविरोधात खंडणी (extortion) चे गुन्हे दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे. या पत्रकारांनी आधी एका स्वस्त धान्य दुकानचालकाची तक्रार करून याबाबत मिडियात वृत्त प्रकाशित केले नंतर सदर तक्रार मागे घेण्यासाठी 2.5 लाखाची खंडणी मागितली. असा आरोप करत चिखलगाव येथील दुकान चालकाने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी दोघांविरोधात खंडणीसह इतर गुन्हे दाखल केले आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी बंडू ज्ञानेश्वर देवाळकर (45) हे चिखलगाव येथील रहिवासी असून त्यांचे स्वस्त धान्याचे दुकान आहे. आरोपी रविंद्र उर्फ बबलू मेश्राम (46) रा. सेवानगर वणी व महेश गंगाधर टिपले (52) रा. सिद्धार्थ वसतिगृहाजवळ हे गेल्या 7 महिन्यांपासून देवाळकर यांच्या दुकानाबाबत तक्रार करून याची पोर्टल व पेपरमध्ये बातमी प्रकाशित करीत होते. दिनांक 11 मार्च रोजी या दोघांनी देवाळकर हे यांच्या दुकानात बोगस कार्ड वापरून दुकान चालवतात, अशी तक्रार उपविभागीय अधिकारी वणी यांच्याकडे निवेदन देऊन केली होती.
एक महिन्यानंतर दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास महेश टिपले हा देवाळकर यांच्या घरी आला. त्याने देवाळकर यांना रविंद्र मेश्राम याने तुमच्याकडे पैसे आणण्यासाठी पाठवले, असा निरोप दिला. यावर कशाचे पैसे अशी विचारणा केली असता, महेश याने रविंद्र मेश्राम याला कॉल लावला व देवाळकर यांच्याशी बोलणे करून दिले. बोगस कार्ड वापरून तुम्ही रास्त धान्य दुकान चालवत असल्याची तक्रार केली आहे. सदर तक्रार मागे घेण्यासाठी 2.5 लाख रुपये द्या, अशी मागणी मेश्राम याने मोबाईल फोनवरून देवाळकर यांच्याकडे केली. त्यावर देवाळकर यांनी बोगस कार्ड वापरून दुकान चालवत असल्यास प्रशासकीय अधिकारी चौकशी करून कार्यवाही करेल. तुम्हाला एवढे पैसे देऊ शकत नाही. दुकान बंद झाले तरी चालेल, असे म्हणत त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.
त्यावर टिपले याने तू वणीत भेट तुला पाहून घेतो. अशी धमकी दिली. यावेळी देवाळकर यांच्या घराशेजारील घटनास्थळी उपस्थित होते, असे तक्रारीत म्हटले आहे. टिपले तिथून निघून गेला. त्यानंतर 9 मे रोजी एका सुपरिचित वृत्तपत्रात व 'जनहित न्यूज' नामक एका पोर्टलमध्ये देवाळकर चालवत असलेल्या दुकानाबाबत वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर वेळोवेळी टिपले व मेश्राम हे देवाळकर विरोधात वृत्तपत्र व पोर्टलमध्ये बातमी प्रकाशित करीत होते. सततच्या तक्रारी व वृत्त प्रकाशित झाल्याने त्रस्त होऊन मंगळवारी देवाळकर यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 308 (2), 351 (2), 351 (3) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.