स्टिंग ऑपरेशन न्यूज | मारेगाव
मारेगाव येथील बदकी भवन मध्ये दि. १६ जून रोजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुका अध्यक्ष दयाल रोगे, तसेच शिंदे सेनेचे गोविंदा निखाडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट यांच्या नेतृत्वात भाजपची विचारधारा स्वीकारत पक्षात प्रवेश केला.
या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधी पक्षांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार, रवी बेलूरकर, तसेच माधव कोहळे, अनुप महाकुलकर, शंकर लालसरे, प्रशांत नांदे, दीपिका रस्से, मंगेश देशपांडे, ज्ञानेश्वर चिकटे आणि अमोल कुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मारोती गौरकार यांच्या पक्षप्रवेशामुळे मारेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात असून, या प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.