राष्ट्रीय स्तरावर वणीचा गौरव!, 🌟 अवघ्या 7 व्या वर्षी अजिंक्य फटाळेचा मोठा पराक्रम; ‘जिनियस Indian Achievers Award 2026’ ने सन्मानित

वणी :-

जिद्द, जिज्ञासा आणि ज्ञानाची अखंड ओढ असेल तर वय हे यशाच्या आड येत नाही, याची प्रचिती वणीतील अवघ्या सात वर्षांच्या अजिंक्य प्रविण फटाळे याने आपल्या कर्तृत्वातून करून दिली आहे. खगोलशास्त्र विषयातील असामान्य ज्ञानाच्या जोरावर त्याने केवळ वणीच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
येथील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अजिंक्यने सौरमाला आणि अंतराळ प्रणालींवरील तब्बल 125 कठीण प्रश्नांची उत्तरे अवघ्या 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत देत आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेची चमक दाखवली. सूर्यापासून ग्रहांचे अंतर, पृथ्वीपासून सूर्याचे अंतर, ग्रहांचे व्यास, तसेच प्रत्येक ग्रहावरील दिवस आणि वर्षांचा कालावधी यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची त्याने अचूक उत्तरे दिली.
अजिंक्यच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाने 28 एप्रिल 2026 रोजी त्याच्या नावाची विक्रम नोंद केली. यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे कार्यरत असलेल्या जिनियस फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘जिनियस इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड 2026’ साठी देशभरातून 173 बुद्धिमान विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातून अंतिम 50 गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अजिंक्यने स्थान मिळवत हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला.
अजिंक्यच्या या यशामुळे वणी शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या कर्तृत्वाने विज्ञान, संशोधन आणि ज्ञानार्जनाची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
आजच्या मोबाईल आणि मनोरंजनाच्या युगात अभ्यासाबरोबरच ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवता येते, हे अजिंक्यने सिद्ध करून दाखवले आहे. जिज्ञासा, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हा संदेश त्याच्या यशातून मिळतो.
“मोठी स्वप्ने पाहा, ज्ञानाची कास धरा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा; यश तुमच्या पावलांशी येईल,” हा प्रेरणादायी संदेश अजिंक्य फटाळेने आपल्या कर्तृत्वातून सर्वांना दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post