वणी :
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेपासून थेट इंग्लंडमधील जगप्रसिद्ध University of Bristolच्या ज्ञानविश्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास वनोजादेवी येथील शिक्षक संदीप संजय गोहोकार यांनी साध्य केला आहे. University of Bristol येथील Master of Development Studies (MSc) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली असून, महाराष्ट्र शासनाच्या नामांकित परदेशी शिष्यवृत्ती सन २०२६-२७ साठीही त्यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांची निर्धारित निकषांच्या आधारे परदेशातील उच्च शिक्षणासाठी निवड केली जाते. गोहोकार यांना मिळालेली ही संधी त्यांच्या वैयक्तिक यशापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विकासाच्या कार्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे.
शैक्षणिक जागृतीपासून युवाशक्तीची उभारणी
मार्गदर्शक रामटेके सर यांच्या क्लासेसमधून महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेत संदीप गोहोकार यांनी पदवी शिक्षणाच्या काळात मित्रांसोबत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक जागृती व व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध उपक्रम सुरू केले. सामाजिक जाण असलेल्या सुशिक्षित युवकांचा समूह पुढे ‘युवाशक्ती’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
युवाशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक समानता, बेरोजगारी, कौशल्य विकास यांसारख्या विषयांवर गावागावांत जनजागृती आणि आंदोलने करण्यात आली. युवकांसाठी कौशल्य विकासाचे कॅम्प आयोजित करण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी पोहोचाव्यात, या उद्देशाने Chevening Scholar ॲड. दीपक चटप यांच्या सहकार्याने महाविद्यालयांमध्ये **‘शिक्षण यात्रा’**ही काढण्यात आली.
सहकारातून आर्थिक सक्षमीकरणाचा प्रयत्न
‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेत गोहोकार यांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार घेतला. शेतकरी, बचतगट आणि युवकांना आर्थिक आधार देत सहकाराच्या माध्यमातून रोजगार व आर्थिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करताना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षण, रोजगार आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधींची माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही त्यांनी सातत्याने काम केले.
इंडोनेशियातील जागतिक परिषदेत युवकांचे प्रतिनिधित्व
त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत Universal Youth Leadership Summit, Indonesia या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांची निवड झाली. या माध्यमातून त्यांनी युवकांचे प्रतिनिधित्व केले.
जि.प. शाळेतील उपक्रमाची BBC मराठीकडून दखल
शिक्षक म्हणून नियुक्तीनंतर जिल्हा परिषद शाळा वनोजादेवी येथे कार्यरत असताना गोहोकार यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अनुभवांना शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे, यासाठी ‘Student Study Room’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविला. या उपक्रमाची दखल BBC मराठी न्यूजने घेतली होती.
समाजपरिवर्तनाच्या उद्देशाने विकास अभ्यासक्रमाची निवड
University of Bristol मधील अभ्यासक्रम निवडताना केवळ रोजगाराच्या दृष्टीने अभ्यासक्रम न निवडता, ज्ञानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणता यावा, या उद्देशाने त्यांनी Master of Development Studies या अभ्यासक्रमाची निवड केली आहे.
विकासाच्या जागतिक संकल्पना, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि सामाजिक समानता यांचा सखोल अभ्यास करून हे ज्ञान ग्रामीण व वंचित समाजाच्या विकासासाठी वापरण्याचा त्यांचा मानस आहे.
“हे यश माझे एकट्याचे नाही”
आपल्या यशाबद्दल संदीप गोहोकार यांनी मित्र, मार्गदर्शक आणि युवाशक्ती संघटनेतील सहकाऱ्यांचे आभार मानले. ॲड. दीपक चटप, जयसिंग पाटील गोहोकार, स्वप्निलदादा गोहोकार, रामटेके सर, आकाश मते, ओम ढेंगळे, चंदू दोडके, रुपेशदादा ठाकरे, नितू तुरणकर, अनिकेत मोहितकर, राहुल खारकर, अमित उपाध्ये, अक्षय कवरसे, गौरव जवादे, धीरज भोयर, आशिष रिंगोले, शुभम गावंडे, सुजित गाताडे यांच्यासह युवाशक्ती संघटनेतील सर्व मित्रांच्या सहकार्यामुळे हा टप्पा गाठता आला असल्याचे त्यांनी सांगितले.