वणी :
मद्यमुक्त जीवनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (ए.ए.) फेलोशिप, वणीच्या वतीने दि. २ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान वणी येथे तीन दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आध्यात्मिक जागृती : एक अमूल्य देणगी’ ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस. बी. हॉल व लॉन, वणी येथे होणार आहे. यावेळी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, डॉ. प्रमोद महाजन (नाशिक) आणि सुधाकर काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या राष्ट्रीय संमेलनासाठी देशातील विविध राज्यांमधून ए.ए.चे सदस्य तसेच अल-अॅनॉन परिवारातील सदस्य सहभागी होणार आहेत. यावेळी मद्यमुक्ती, व्यक्तिमत्त्व विकास, कौटुंबिक पुनर्बांधणी, सामाजिक जबाबदारी, आध्यात्मिक मूल्ये आणि निरोगी जीवनशैली आदी विविध विषयांवर अनुभवाधारित सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
मद्याच्या व्यसनातून मुक्त होण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना परस्पर अनुभव, सहकार्य आणि आधाराच्या माध्यमातून मद्यमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणे, तसेच समाजात मद्यविषयक सकारात्मक जनजागृती निर्माण करणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय संमेलनाच्या माध्यमातून मद्यमुक्त जीवनशैली, आध्यात्मिक मूल्ये आणि कौटुंबिक-सामाजिक पुनर्बांधणीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.