वणी :-
शहरातील मामा पान सेंटर येथे अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला व खर्रा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदाराविरुद्ध विविध कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य) यवतमाळ येथील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद नवाज अली सय्यद बशीर अली (वय 32, रा. माळीपुरा रोड, वणी) याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. ही कारवाई दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास मामा पान सेंटर, मेन पोस्ट ऑफिस समोर, वणी येथे करण्यात आली.
कारवाईदरम्यान आरोपीच्या दुकानातून विविध प्रकारचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. यात सिखेचर, विमल, पानपराग या पानमसाल्याचे पाकीटे तसेच सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित खर्रा अशा एकूण 1.47 किलो वजनाच्या आणि सुमारे 3,240 रुपये किमतीच्या पदार्थांचा समावेश आहे.
सदर प्रकरणात अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत कलम 26(2), 27(3), 30(2)(ए), 59 तसेच नियम व नियमने 2011 सोबत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस करत असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठ्यावर प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.