वणी : प्रतिनिधी
शहरातील युवक-युवतींमध्ये शौर्य, शिस्त आणि ऐतिहासिक परंपरेची जाणीव निर्माण व्हावी या उदात्त उद्देशाने ‘शिवकालीन ज्ञान संवर्धन व आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर’चे आयोजन करण्यात आले आहे. शिव आनंद बहुउद्देशीय संस्था, रॉयल फाउंडेशन आणि वणी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे शिबिर २० एप्रिल ते २८ जून २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत नगर भवन (कल्याण मंडप), आंबेडकर चौक, वणी येथे पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सेल्फ डिफेन्स (मार्शल आर्ट), व्यक्तिमत्व विकास, शिवचरित्र व शंभूराजे विचार कार्यशाळा यांसोबतच लाठी, काठी, तलवार, दांडपट्टा, भाला, दोरखंड व नॉन चोक यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढवून शारीरिक व मानसिक बळकटी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे, हे शिबिर ५ वर्षांवरील मुला-मुलींसाठी पूर्णतः मोफत असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून कु. तेजस्विनी राजू गव्हाणे कार्यभार सांभाळणार आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कु. तेजस्विनी गव्हाणे (९५१८७६४७५१) व राजू गव्हाणे (९७६४२५३२५३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिव-आनंद काठी-काठी ग्रुप, वणी यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे वणीतील तरुणांमध्ये शौर्यपरंपरेची जपणूक होऊन स्वसंरक्णाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.