जैन ले आऊटमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली , श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पुण्यतिथी कार्यक्रम; ग्रामगीता, व्यसनमुक्ती व स्वच्छतेच्या विचारांचे स्मरण

वणी : 

शहरातील जैन ले आऊट येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमात ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी राष्ट्रसंतांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत ग्रामगीतेतील विचार, व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेच्या संदेशाचे महत्त्व विशद केले.
यावेळी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका किरण देरकर यांनी आजच्या काळातही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. या विचारांचे जतन, जोपासना आणि प्रसार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण चटप होते. अतिथी म्हणून किरण देरकर, नामदेव तुराणकर आणि नाना बदखल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि गुरुदेव उपासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post