मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ऑटोचालकांवर कारवाई करा; मनसे वाहतूक सेनेची मागणी

वणी :

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना मुख्य मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच काही ऑटोचालकांकडून रस्त्यावरच वाहने थांबवून प्रवासी भरण्याचे प्रकार सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराची दखल घेत मनसे वाहतूक सेनेने वाहतूक पोलिसांकडे संबंधित ऑटोचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिवाळीचा सण जवळ आल्याने वणीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, पांडे मोबाईल शॉप ते आंबेडकर चौक या प्रमुख मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. अशातच काही ऑटोचालक मुख्य रस्त्यांवरच वाहने थांबवून प्रवासी गोळा करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. अनेकदा आपत्कालीन वाहनांनाही या कोंडीतून मार्ग काढताना अडचणी येण्याची शक्यता निर्माण होत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, या मार्गावर पोलिस प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर प्रभावी नियंत्रण दिसून येत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांनी या प्रकरणी वाहतूक पोलिसांच्या उपशाखेकडे कारवाईची मागणी केली आहे. मुख्य रस्त्यांवर विनाकारण फेऱ्या मारणाऱ्या तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करून प्रवासी भरणाऱ्या ऑटोचालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, दिवाळीच्या काळात बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कोणती उपाययोजना केली जाते आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर काय कारवाई होते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post