अखेर WCL सुरक्षा रक्षकाच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

स्टिंग ऑपरेशन न्यूज / वणी :

वणी तालुक्यातील कोळारपिंपरी येथील प्रगती नगर कॉलनी परिसरात WCL सुरक्षा रक्षकाचा निर्घृण खून झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती. या प्रकरणाचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. अंचल मोहन उईके (वय २८, रा. प्रगती नगर कॉलनी, कोळारपिंपरी, वणी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
मृतक ओमप्रकाश हिरा प्रसाद (वय ४५) हे कोळारपिंपरी येथील WCL प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री कार्यालय परिसरात त्यांच्या डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा करून अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केला होता. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११५९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अंचल मोहन उईके याचा शोध घेण्यात आला. घटनेच्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित असल्याची माहितीही तपासात पुढे आली. पोलिसांनी त्याला २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ३१ ऑक्टोबरच्या रात्री कॉलनी परिसरातील एका घटनेच्या अनुषंगाने कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याच्या मुद्द्यावरून सुरक्षा रक्षक ओमप्रकाश प्रसाद आणि आरोपी अंचल उईके यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. याच वादातून आरोपीने ओमप्रकाश प्रसाद यांच्या डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post