गजानन कासावार यांच्या पुढाकारातून अमरावती विद्यापीठात विद्यार्थी साहित्य संमेलनाला प्रारंभ

वणी :-

अमरावती विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त साहित्यिक गुणांना वाव देण्यासाठी आता महाविद्यालयीन स्तरावर दरवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाला गती देण्याचे श्रेय अधिसभा सदस्य गजानन कासावार यांच्या पुढाकाराला जाते.
दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत कासावार यांनी विद्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला असून विद्यार्थी विकास विभागातर्फे त्याबाबत अधिकृत आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. परिणामी, यंदाच्या वर्षापासून अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा विषय यशस्वीपणे मार्गी लागला.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात मराठी वाङ्मय हा पदवी व पदव्युत्तर स्तरावरील महत्त्वाचा विषय असून अनेक विद्यार्थी साहित्य क्षेत्रात सक्रिय आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार मातृभाषेला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्यकृती सादर करण्यासाठी तसेच नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अकोला येथील श्रीमती राधादेवी गोयनका महाविद्यालय आणि बुलढाणा येथील विदर्भ महाविद्यालयात या संमेलनाची प्रत्यक्ष सुरुवात झाली असून भविष्यात हा उपक्रम राज्यभर आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post