डीजे निर्बंधावरून गणेश मंडळांची नाराजी; नियमांच्या चौकटीत परवानगीची मागणी, वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; न्यायालयीन आदेशामुळे डीजेला परवानगी नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण

वणी : 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेवरील निर्बंधाच्या मुद्द्यावरून वणीतील गणेश मंडळांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. १६ सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेवरील निर्बंधाबाबत नाराजी व्यक्त करीत प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या.
शहरातील अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी डीजेचे आगाऊ बुकिंग करून पैसे भरले आहेत. मात्र, ऐनवेळी निर्बंध लागू झाल्याने मंडळांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियम, वेळेची मर्यादा तसेच निर्धारित ध्वनिपातळीचे पालन करण्याची तयारी मंडळांनी दर्शविली.
त्यामुळे सरसकट डीजे बंदी करण्याऐवजी शासन व न्यायालयाच्या नियमांच्या चौकटीत डीजे तसेच बँड-बॅंजोला परवानगी द्यावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेला परवानगी देता येणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले. गणेशोत्सव शांततेत व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून पार पाडण्यासाठी मंडळांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीचे संचालन व आभार सहायक पोलिस निरीक्षक शेखर वांढरे यांनी मानले.
बैठकीला पोलिस उपविभागीय अधिकारी सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर, शांतता समितीचे प्रा. पुरुषोत्तम पाटील, नारायण गोडे, रज्जाक पठाण, आबिद हुसैन, निलिमा ताई काळे, मंगलाताई झिलपे, मंदाताई बांगडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार तसेच शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post