वणी :
पोलीस ठाणे वणी हद्दीत अंमली पदार्थ (MD – मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २,३०,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहू नयेत आणि विशेषतः अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा बसावा, यासाठी पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी सर्व ठाणेदार व स्थानिक गुन्हे शाखेला कठोर निर्देश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी करताना स्थानिक गुन्हे शाखेला काही तरुणांमध्ये MD (मेफेड्रोन) ड्रगचा वापर वाढत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
🔍 सापळा रचून आरोपींना पकडले
दि. १८ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी येथे असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, राहुल ठाकुरवार हा देशमुख वाडी परिसरात बसस्थानकाच्या मागील रस्त्यावर MD ड्रग विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटनास्थळी सापळा लावला.
दरम्यान, संशयित हालचाल दिसताच पोलिसांनी दोन इसमांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांची ओळख
राहुल दिलीप ठाकुरवार (वय ४०, रा. देशमुख वाडी, वणी),प्रितम लिलाराम केशवाणी (वय ४४, रा. गुरुनानक नगर, वणी)अशी पटली.
💼 मुद्देमाल जप्त
पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून MD (मेफेड्रोन) – २९ ग्रॅम १८ मि.ग्रॅ. (किंमत १,२७,०८० रु.)रोख रक्कम, मोबाईल फोन,मोपेड वाहन
असा एकूण २,३०,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे वणी येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, सपोनी/ दत्ता पेंडकर, धनराज हाके, सुनील खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी, सतिश फुके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
👉 शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.