🔴 मुख्य आरोपींसह दोषींना फाशीची मागणी; वणीत रणरागिणींचा संताप उसळला!

वणी | प्रतिनिधी

परतवाडा (जि. अमरावती) येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सुमारे १८० हून अधिक युवतींचे शोषण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर वणी शहरातही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण करत अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून निवेदन १७ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, वणी मार्फत सादर करण्यात आले. यावेळी शहरातील रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नायब तहसीलदार श्री. खिरेकर यांनी हे निवेदन स्वीकारून संबंधित भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा प्रकार केवळ वैयक्तिक गुन्हा नसून संघटित गुन्हेगारीचा भाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (MCOCA) तसेच अल्पवयीन मुलींचा समावेश असल्यास ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी.
तसेच, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असताना पोलिसांनी स्वतःहून (सुओ-मोटो) कारवाई का केली नाही, तसेच सुरुवातीच्या दिरंगाईमुळे आरोपीला पसार होण्याची संधी कशी मिळाली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व जलद व्हावा यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमावे आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय, सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने व्हायरल झालेले सर्व व्हिडिओ तात्काळ हटवून ते प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीडित युवतींची ओळख गुप्त ठेवून त्यांना संरक्षण द्यावे आणि त्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असेही निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही हिंदू जनजागृती समितीने दिला आहे.
निवेदन देताना रणरागिणी सदस्या सौ. सरिता कोंडावार, वंदना राजूरकर, कल्पना खामनकर, रजनी राजूरकर, नाजूका राखुंडे, माधुरी सोयाम, मंजू पांडे तसेच समितीचे लहू खामनकर, संजय पांडे, विठ्ठल देठे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post