नगर वाचनालयात स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे प्रदर्शन

वणी:
एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच नगर वाचनालयाचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगर वाचनालय, वणी येथे नव्याने खरेदी करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे प्रदर्शन २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघचालक हरिहर भागवत होते. यावेळी युवकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध विषयांवरील वाचनीय व उपयुक्त ग्रंथांची खरेदी करून ते वाचकांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ होणार असून, नगर वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूरक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्राची पाथ्रडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिव गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे, राम मेंगावार व कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post