वणी :
तालुक्यातील निंबाळा रोड येथील रहिवासी मयूर बोरीकर हा युवक गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. घरातील एकमेव कर्ता व्यक्तीच गंभीर आजाराने त्रस्त झाल्याने कुटुंबावर उपचारासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. वृद्ध आईला आजारी मुलाची देखभाल करताना मोठ्या आर्थिक व मानसिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
या कुटुंबाची परिस्थिती ‘थोडंसं जगणं समाजासाठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते गुणवंत पचारे यांना समजली. त्यांनी तत्काळ पुढाकार घेत बोरीकर यांच्या घरी जाऊन रुग्णाच्या आईच्या हाती ११ हजार ११६ रुपये रोख मदत सुपूर्द केली. तसेच मयूरच्या उपचारादरम्यान कुटुंबाला आधार मिळावा यासाठी महिनाभराचा सकस किराणा व अन्नधान्य देण्यात आले.
या मदतीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बोरीकर कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे. गरजू व निराधार रुग्णांना सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.