शेतात विषारी औषध प्राशन करून इसमाची आत्महत्या कुरई येथील घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट, परिसरात खळबळ

वणी :

 शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरई येथे एका इसमाने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
संदीप देविदास काळे (वय अंदाजे ३० वर्षे, अविवाहित), रा. कुरई, याने २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेतात विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय, कोरपना येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत संदीप काळे यांच्या नावावर शेतजमीन नसून मौजा बोरी येथील गट क्रमांक १३ मध्ये १.५८ हेक्टर क्षेत्राची जमीन त्यांचे वडील देविदास सखाराम काळे यांच्या नावावर आहे. संदीप यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संदीप यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिरपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आत्महत्येच्या कारणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post