वणीतील वाहतूक कोंडीवर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, वन-वे व्यवस्था पुन्हा सुरू करा; कामगार चौकात वाहतूक चौकी उभारण्याची मागणी , विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेला निवेदन

वणी :

वणी शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर अखेर शिवसेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेला निवेदन सादर करून शहरातील वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल, अशा प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात कोविड काळात बंद करण्यात आलेली एकेरी वाहतूक व्यवस्था (वन-वे) तातडीने पुन्हा सुरू करावी, टिळक चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करावेत तसेच कामगार चौकात वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी वाहतूक चौकी उभारावी, अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
शहरातील वाढती वाहनसंख्या, अनियंत्रित पार्किंग आणि प्रमुख चौकांमधील सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने केवळ पाहत बसण्याऐवजी ठोस आणि निर्णायक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शहरातील वाहतूक प्रश्न हा आता केवळ गैरसोयीचा विषय राहिलेला नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
यावेळी विजय चोरडिया, दीपक कोकास, शुभम गोरे, वसुधा ढगे, मनीषा कोंगरे, भाग्यश्री वैद्य, सोनाली पुरी, हिमांशू बोहरा, शम सिद्दीकी, अनिल ढगे, अमृत पुरी, सुनील डोंगरे, राहुल उपाते आणि प्रज्योत ठावरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post