पावसाळ्यात स्क्रब टायफस रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा; विजय पिदुरकर यांची मागणी

वणी :

पावसाळ्यात वाढणाऱ्या स्क्रब टायफस या गंभीर संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी तालुका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सप्टेंबर २०२५ मध्ये निर्गुडा नदीत पोहून आल्यानंतर आजारी पडलेल्या इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. वीर दिवाकर बोबडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. वैद्यकीय तपासणीत त्यांचा मृत्यू स्क्रब टायफसमुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे पिदुरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
पावसाळ्यात नदीकाठ, नाले, दाट झुडपे, गवताळ व ओलसर परिसरात स्क्रब टायफसचा धोका अधिक वाढतो. संक्रमित अळ्यांच्या (चिगर्स) चाव्यामुळे हा आजार होतो. सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात. वेळेत निदान व उपचार न झाल्यास फुफ्फुसे, मूत्रपिंड, हृदय आणि मेंदूवर गंभीर परिणाम होऊन प्रसंगी रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागात व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, नदीकाठ व झुडपी परिसराची स्वच्छता करणे, आवश्यक ठिकाणी कीटकनाशक फवारणी करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये निदान व उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवणे तसेच नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी विजय पिदुरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post