मेंढोली येथे महिलेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू , घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

वणी :

तालुक्यातील मौजा मेंढोली येथे एका 35 वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 14 जुलै 2026) दुपारी सुमारे 1.10 वाजताच्या सुमारास मौजा मेंढोली येथील रहिवासी ज्योत्स्ना अजय येसेकर (वय 35 वर्षे) यांनी त्यांच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदनानंतर बुधवारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, ज्योत्स्ना येसेकर यांनी विषारी औषध प्राशन करण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
मयत ज्योत्स्ना येसेकर यांच्या पश्चात पती अजय मुरलीधर येसेकर (वय 43), मुलगा लोकेश (वय 16) आणि मुलगा मयूर (वय 13) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने येसेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post