वणी :
वणी शहरातील लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल ते नांदेपेरा चौफुलीपर्यंतचा रस्ता अत्यंत जीर्ण व धोकादायक बनल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, पालक, शाळेच्या बस, रिक्षा तसेच इतर वाहने प्रवास करतात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची पृष्ठभाग पूर्णपणे उखडलेली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून काही ठिकाणी वाहने घसरून पडण्याच्या घटनाही घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तात्काळ पाहणी करून दुरुस्तीच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देत लवकरात लवकर काम सुरू करावे. तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास, धिरज राजुरकर, अनिल उलमाले, अजिंक्य शेंडे, वसुधा ढगे, हिमांशु बोहरा, शुभम गोरे, संतोष लक्षट्टीवार, प्रविण पिसे, धर्मा काकडे, उमेश चिडे, कैलास मेश्राम, संदीप वाघमारे, अयाज शेख, साई आंदलवार, राहुल उपाते आणि कपिल कुंटलवार आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.