पुरड (ने) येथे 'कपास क्रांती' अंतर्गत कापूस पिकावरील शेतकरी प्रशिक्षण उत्साहात

वणी : विशाल ठोंबरे 

तालुक्यातील मौजा पुरड (ने) येथे दि. ४ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत सभागृहात केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) २०२६-२७ अंतर्गत कापूस पिकावरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पुरड (ने) चे सरपंच गणेश टेकाम, गावातील शेतकरी बचत गटाचे सदस्य, प्रगतशील शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान सहाय्यक कृषि अधिकारी श्री. प्रशांत कोठारे यांनी कापूस पिकातील प्रमुख किडी व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, बेडवरील लागवडीचे फायदे, उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर पीक निरीक्षण तसेच शाश्वत शेती पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना शिफारशीनुसार कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसंदर्भातील विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून समाधानकारक उत्तरे मिळवली. प्रशिक्षणामुळे आधुनिक शेती पद्धतींबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापूस उत्पादनात वाढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात आले असून, सहाय्यक कृषि अधिकारी श्री. प्रशांत कोठारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post