विरोधी पक्षाच्या मतदारसंघांवर शिक्षक भरतीत अन्यायाचा आरोप; वणीतील रिक्त पदे तातडीने भरण्याची आ. संजय देरकर यांची मागणी

स्टिंग ऑपरेशन न्यूज | 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, झरी-जामणी आणि मारेगाव या तालुक्यांमधील जिल्हा परिषद तसेच शासनाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा आमदार संजय देरकर यांनी उपस्थित केला आहे. या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून, या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ते आज, दि. ७ जुलै २०२६ रोजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेध निदर्शने करणार आहेत.
आमदार देरकर यांनी म्हटले आहे की, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आढावा घेतल्यास विरोधी पक्षाच्या आमदारांचे प्रतिनिधित्व असलेल्या मतदारसंघांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिक्षक भरती आणि पदस्थापनेच्या प्रक्रियेत राजकीय भेदभाव केला जात असल्याची गंभीर शंका निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा खेळ कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणासारख्या मूलभूत आणि संवेदनशील क्षेत्रात राजकारण होऊ नये. शिक्षक भरतीचा निकष हा विद्यार्थ्यांची गरज, शाळांची परिस्थिती आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन निश्चित करण्यात यावा, अशी ठाम भूमिका आमदार संजय देरकर यांनी मांडली.
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, शिक्षक भरती प्रक्रियेत होत असल्याचा आरोप असलेला अन्याय दूर करावा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरू असलेली हेळसांड थांबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हा कोणत्याही राजकीय मतभेदांपेक्षा मोठा असल्याचे नमूद करत, राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून वणी विधानसभा क्षेत्रासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व रिक्त शिक्षक पदे प्राधान्याने भरावीत, अशी मागणी आमदार संजय देरकर यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post