वणी :
सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी, वणी येथील असिस्टंट प्रोफेसर प्रा. प्रशांत खंगार यांनी बी. फार्म. (B.Pharm) सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या ‘A Textbook of Herbal Drug Technology’ या शैक्षणिक पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. Brilliant Publication House, Akola यांच्यामार्फत प्रकाशित झालेल्या या पुस्तकामुळे फार्मसी शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयाच्या शैक्षणिक योगदानात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.
या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगीनवार तसेच उपाध्यक्ष मोहन बोनगीनवार यांच्या हस्ते प्रा. प्रशांत खंगार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्राचार्यांनी प्रा. खंगार यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे विशेष स्वागत करण्यात आले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे संशोधन व लेखन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. खंगार यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधनपर परंपरेला नवी उंची प्राप्त झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.