जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या निलंबनाविरोधात पटवारी संघाचा एल्गार, काळ्या फिती लावून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

वणी :

विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघ, नागपूरच्या जिल्हा शाखा यवतमाळ अंतर्गत उपविभाग शाखा वणीच्या वतीने सोमवारी वणी तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. "संघ शक्ती कलीयुगे" आणि "पटवारी एकता जिंदाबाद..!"च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
जिल्हा प्रशासनाच्या कथित दडपशाही धोरणांचा निषेध नोंदवत तसेच पटवारी संवर्गाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी हे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. नेर तालुक्यातील चार ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत संघटनेने विशेषतः जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यावरील निलंबन ही सूडबुद्धीने करण्यात आलेली अन्यायकारक कारवाई असल्याचा आरोप केला.
या निषेधार्थ वणी उपविभागातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी हाताला काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग घेतला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन १८ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना सादर करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
विदर्भ पटवारी संघाचे आद्य संस्थापक के. माखनलालजी यदू आणि संघर्षी महर्षी के. व्ही. एम. उजवणे यांच्या प्रेरणेने तसेच केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी संघटनांचा आवाज दाबण्याचा आणि कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप केला.

प्रमुख मागण्या :
जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यासह नेर तालुक्यातील चार ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन विनाशर्त मागे घेण्यात यावे.
तहसीलदार नेर यांच्याकडून होत असलेल्या कथित छळाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे रखडलेले जानेवारी महिन्याचे वेतन तातडीने अदा करण्यात यावे.
सूडबुद्धीने करण्यात आलेल्या विविध कारवाया रद्द करण्यात याव्यात.
ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात.
यावेळी उपविभाग अध्यक्ष नितेश पाचभाई, उपाध्यक्ष संदेवल कुळमेथे आणि सचिव मुकेश इंगोले यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, "भरत पिसे हे कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढत आले आहेत. त्यांच्यावरील निलंबन ही संपूर्ण पटवारी संवर्गाचा अपमान करणारी कारवाई आहे. निलंबन तातडीने मागे न घेतल्यास आणि रखडलेले वेतन अदा न केल्यास वणी उपविभागासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे कामबंद आंदोलन छेडण्यात येईल."
आंदोलनात विदर्भ पटवारी संघ, जिल्हा शाखा यवतमाळ (उपविभाग शाखा वणी) चे सर्व पदाधिकारी तसेच महिला व पुरुष ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काळ्या फिती लावून आणि जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी जिल्हाध्यक्ष भरत पिसे व इतर सहकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post