बंद जलशुद्धीकरण केंद्रे तातडीने सुरू करा; शिवसेनेचे नगर परिषदेला निवेदन, नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका : विजय चोरडिया

वणी :

वणी शहरातील विविध ठिकाणी नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेली जलशुद्धीकरण केंद्रे दुरुस्तीअभावी बंद पडल्याने नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही केंद्रे तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दि. १० जून २०२६ रोजी शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात नगर परिषद वणीचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, नगर परिषदेमार्फत शहरातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने विविध भागांत जलशुद्धीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही केंद्रांतील यंत्रसामग्री बिघाडामुळे बंद अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
यामुळे नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होत असून त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद पडलेली जलशुद्धीकरण केंद्रे तात्काळ दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन सादर करताना शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, मनीष सुरावार, शुभम गोरे, राहुल मुंजेकर, राहुल पारखी, संगीता मुरस्कर, वसुधा ढगे, प्रणोती बांगडे, भाग्यशी वैद्य यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरळीत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post