नगर वाचनालयात साने गुरुजींची ७६ वी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी

वणी :

ज्येष्ठ साहित्यिक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांची ७६ वी पुण्यतिथी गुरुवारी (दि. ११ जून) येथील नगर वाचनालयात अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. नगर वाचनालयात लावण्यात आलेल्या साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमाला नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ तसेच साने गुरुजींच्या विचारांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि राष्ट्रसेवेतील योगदानाचे स्मरण केले.
ममता, करुणा, मानवता आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या साने गुरुजींचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘श्यामची आई’ या अजरामर साहित्यकृतीमुळे साने गुरुजी मराठी साहित्यविश्वात अजरामर झाले असून, हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेवा मानले जाते. त्यांच्या साहित्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून, त्यांचे विचार आजही तितकेच समर्पक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सचिव प्रा. अभिजित अणे यांनी केले. याप्रसंगी प्रा. स्वानंद पुंड, हरिहर भागवत, अशोक सोनटक्के, राजेश महाकुलकर, स्नेहलता चुंबळे, अरुण कावडकर, गजानन भगत, राजू धावंजेवार, लता पांडे, सुनील इंदुवामन ठाकरे, जयंत लिडबिडे, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार आणि कल्पना राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून साने गुरुजींच्या साहित्य, विचार आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला उजाळा देण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post