वणी :
वणी शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाणीपुरवठ्याच्या विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले असून या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नगरसेवकांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी, नगर परिषद वणी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभागातील अनेक भागांमध्ये नियमित नळ येत नसून नळ आल्यानंतर काही वेळातच पाणीपुरवठा बंद होतो. काही ठिकाणी दूषित व घाण पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच चार-चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय वारंवार विविध कारणे सांगून पाणीपुरवठा खंडित केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. पाईपलाईन वारंवार फुटणे, नवीन नळ कनेक्शन प्रलंबित असणे, मंजूर झालेल्या नळांची टाकीपर्यंत जोडणी न होणे तसेच काही भागात अद्याप पाईपलाईनच टाकण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ज्या भागात नळ सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांना नियमित, पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास भाग पडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.