दिल्लीतील आंदोलनाला वणीतून जोरदार पाठिंबा;, युवक व विद्यार्थ्यांचे शांतीपूर्ण आंदोलन

वणी :

दिल्लीतील जंतरमंतर येथे २० जून २०२६ रोजी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या "कॉकरोच जनता पार्टी"च्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वणी येथे युवक व विद्यार्थ्यांनी शांतीपूर्ण आंदोलन करून एकजूट दर्शविली. वणीतील नामांकित युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेने या आंदोलनाला जाहीर व सक्रिय पाठिंबा देत घोषणाबाजीद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
विविध स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, वाढती बेरोजगारी तसेच शिक्षण क्षेत्राचे वाढते खाजगीकरण या प्रमुख मुद्द्यांवर हे आंदोलन केंद्रित होते. शनिवारी, २० जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, टिळक चौक, वणी येथे या शांतीपूर्ण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, AISF संघटना तसेच विविध स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. याशिवाय वणी वकील संघ आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
युवकांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्याच्या उद्देशाने आयोजित या आंदोलनात विद्यार्थी, वाचनालयातील परीक्षार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून युवकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेने या माध्यमातून युवकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
केंद्र सरकारने या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा येत्या काळात वणी तालुक्यात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post