वणी: प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री, सेवन आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत वणी पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. नागपूर-वणी दरम्यान कार्यरत असलेल्या एम.डी. (मेफेड्रोन) अमली पदार्थांच्या साखळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी 19.27 ग्रॅम एम.डी. अमली पदार्थ आणि मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष अभियानादरम्यान, 19 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9.45 वाजता वणी पोलिसांनी गणेशपूर रोड परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. यावेळी कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (28, रा. तेलीफैल, वणी) याची झडती घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिक पाऊचमध्ये ठेवलेला 19.27 ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) अमली पदार्थ आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत 1 लाख 34 हजार 890 रुपये असून आरोपीकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
‘कॉकरोच’चे नागपूर कनेक्शन उघड
पोलिस चौकशीत आरोपी कौतुक मेश्राम याने हा अमली पदार्थ प्रज्योत उर्फ ‘कॉकरोच’ महेश उपरे (27, रा. तेलीफैल, वणी, सध्या नागपूर) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू केला.
या माहितीच्या आधारे वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 514/2026 अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पूर्वीच्या गुन्ह्यातील आणखी तिघे जाळ्यात
दरम्यान, यापूर्वी दाखल असलेल्या गुन्हा क्र. 479/2026 च्या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये प्रज्योत उर्फ कॉकरोच महेश उपरे (27), अविनाश विजय पाटील (42, रा. छोरिया ले-आऊट, वणी) आणि रवींद्र धनराज गुप्ता (34, रा. रंगनाथ नगर, वणी) यांचा समावेश आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
एम.डी. किंवा इतर अमली पदार्थांच्या विक्री, साठवणूक अथवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या पथकाने केली यशस्वी कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल आणि ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोउपनि साजिद सय्यद, पोउपनि सुयोग महापुरे तसेच पोलीस अंमलदार मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पोपुलवार, गणेश मेश्राम, अरविंद बुच्चे, मिथुन राऊत, श्याम राठोड आणि निलेश आडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
बॉक्स न्यूज
*वणीत एम.डी.विरोधातील मोहीम तीव्र*