वणीत 21 जून रोजी बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होणार

वणी :

बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त रविवार, दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 5.45 ते 7.00 या वेळेत पोलीस स्टेशन वणी समोरील शासकीय मैदानावर भव्य सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निरोगी, सुखद आणि आनंदी वृद्धत्व प्राप्त करण्यासाठी योग हा एक प्रभावी व नैसर्गिक पर्याय मानला जातो. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने वणी शहरातील अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैली आहे. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यास तणावमुक्त, निरोगी आणि सकारात्मक जीवन जगणे शक्य होते. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांनी या योग महोत्सवात उपस्थित राहून योगाचे महत्त्व जाणून घ्यावे आणि योगाला आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस प्रशासन वणी विभाग, महाराष्ट्र योग शिक्षक संघ (वणी) अंतर्गत जगन्नाथ बाबा योग वर्ग, सदाशिवनगर-चिखलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमात शंकरबाबा देवस्थान मंदिर योग ग्रुप (चिखलगाव), इच्छाशक्ती योग ग्रुप (वणी), लोकमान्य टिळक महाविद्यालय योग ग्रुप, चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ (गणेशपूर), आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ (चिखलगाव), तसेच हॅपी थॉट्स परिवार अंतर्गत ध्यान-ज्ञान केंद्र (नांदेपेरा रोड व जत्रा रोड, वणी) या विविध संस्था व योग गटांचा सहभाग राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post