वणी :
दिल्ली येथील जंतरमंतरवर २० जून २०२६ रोजी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात आयोजित आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी वणीतील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणारे युवक-युवती पुढे सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर वणी येथे शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन शनिवार, २० जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, टिळक चौक, वणी येथे होणार आहे.
स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटना, वाढती बेरोजगारी तसेच शिक्षण क्षेत्रातील वाढते खाजगीकरण यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
युवकांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी विद्यार्थी, पालक, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजक संघटनांकडून करण्यात आले आहे.
युवकांच्या हक्कांसाठी आणि शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांवर व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे आंदोलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले.