वणी :
बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 5.45 ते 7.00 या वेळेत पोलीस स्टेशन वणी येथील मैदानावर भव्य सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस प्रशासन वणी विभाग तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघ (वणी) अंतर्गत जगन्नाथ बाबा योग वर्ग, सदाशिवनगर-चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने योगप्रेमी, योग शिक्षक आणि योग साधकांनी सहभाग नोंदवून योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
वणी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सूर्यनमस्कारासह विविध योगासने आणि योगनृत्याचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. शंकरबाबा देवस्थान मंदिर योग ग्रुप, चिखलगाव येथील योग शिक्षक व योग साधकांनी विविध योग प्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांना योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे पटवून दिले.
यावेळी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे पदाधिकारी, योग शिक्षक आणि योग साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.