नामदेव अर्जुन तरवटकर यांचे मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान; समाजापुढे आदर्श

वणी : 

वणी तालुक्यातील टाकळी येथील संत गाडगेबाबांच्या विचारांचे कट्टर अनुयायी तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र नामदेव तरवटकर यांचे वडील नामदेव अर्जुन तरवटकर यांचे शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी सकाळी सव्वासात वाजता वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या अंतिम इच्छेचा सन्मान राखत कुटुंबीयांनी तत्परतेने नेत्रदान व देहदानाची प्रक्रिया पूर्ण करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
नामदेवराव यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र रवींद्र तरवटकर, सून सौ. कोकीळा तरवटकर तसेच कन्या गीता शिरपूरकर, लता भोस्कर व नीता शिरपूरकर यांनी डॉक्टर अमोल बुटले (विसापूर) यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूरचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरच्या शरीररचना शास्त्र विभागाशी तसेच सर्वोपचार रुग्णालयाच्या नेत्रदान विभागाशी संपर्क साधला.
यानंतर सर्वोपचार रुग्णालय, चंद्रपूरचे नेत्रदान समन्वयक योगेंद्र इंदुरकर आणि त्यांच्या चमूने नामदेवराव यांचे मरणोत्तर नेत्रदान यशस्वीरीत्या पूर्ण केले. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचना शास्त्र विभागाचे डॉ. कुलेश चांदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
नेत्रदान करतांना तरवटकर कुटुंबीय 

 संपूर्ण प्रक्रियेत जावई श्याम आंबीलकर, नात अश्विनी आंबीलकर, नातू शुभम तरवटकर, जावई विनोद शिरपूरकर, महादेव भोस्कर, मनोज शिरपूरकर, गुलाबराव मुके, शामराव मुके, विलास नांदे, विनोद नांदे, दाणेबाई नांदे, अजाबराव वाघमारे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
यानंतर शेतकरी संघटनेचे नेते देवराव धांडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ बोबडे यांनी केले. यावेळी प्रदीप अडकिने आणि डॉ. अमोल बुटले यांनी नेत्रदान व देहदानाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच नांदे साहेब (घुग्गुस) आणि जगन्नाथ टोंगे गुरुजी यांनी स्मृतीशेष नामदेवराव तरवटकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या साधेपणा, समाजसेवा आणि मानवतावादी विचारांना उजाळा दिला.
नामदेव अर्जुन तरवटकर यांच्या मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानाच्या निर्णयामुळे समाजात जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार असून, त्यांच्या या कार्याची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post