वणी :
वणी शहरात सुरू असलेल्या अवैध वरळी मटका जुगार व्यवसायाविरोधात वणी पोलिसांनी शनिवारी (दि. १३ जून) मोठी धडक कारवाई करत शहरातील विविध भागांमध्ये एकाच दिवशी सहा ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १२ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत सिंधी कॉलनी परिसरातील मनोहर बारसमोरील सार्वजनिक ठिकाणी आसिद खान आमीर खान पठाण (३३) व हरीष सुरेश कापसे (३५) यांना वरळी मटका खेळविताना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून मटका पट्टी बुक, कार्बन, पेन व ९५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत एकता नगर येथील नगर परिषद कॉम्प्लेक्सजवळ दायाराम फत्ते यादव (५२) व सय्यद अलताफ सय्यद रजाक (४०) यांच्याकडून मटका साहित्य व ७५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
तिसऱ्या प्रकरणात ब्राम्हणी फाटा चौकातील रिलॅक्स बारसमोर अक्षय जगन दुपारे (३०) याला वरळी मटका लिहिताना पकडण्यात आले. चौकशीत त्याने शेख इकबाल शेख हुसेन (४५) याच्यासाठी काम करत असल्याची कबुली दिली. या कारवाईत ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौथ्या कारवाईत दीपक चौपाटी जत्रा मैदान परिसरात शंकर गणपत धंदरे (५८) याला ताब्यात घेण्यात आले, तर आसिद खान मेहबूब खान हा आरोपी फरार झाला. पोलिसांनी १,४८० रुपये रोख रक्कम व मटका साहित्य जप्त केले.
पाचव्या कारवाईत नगर परिषदेजवळील ज्योती बार गल्ली परिसरात सय्यद शेरु सय्यद ताज (३३) व मंगेश शंकर शेंद्रे (३२) यांच्याकडून ३६० रुपये व मटका साहित्य जप्त करण्यात आले.
सहाव्या कारवाईत भाजी मंडी परिसरात सोहेल खान अकबर खान (१९) याला अटक करण्यात आली, तर बबलू उर्फ सय्यद जाफर सय्यद ननू हा आरोपी फरार झाला. या ठिकाणी ६१० रुपये रोख रक्कम व मटका साहित्य जप्त करण्यात आले.
सर्व आरोपींकडून मटका पट्ट्या, कार्बन पेपर, पेन व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.