अभाविपच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ऐतिहासिक बारवेला नवसंजीवनी, वणीच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम

वणी :

वणी शहरातील शतकांपूर्वीच्या ऐतिहासिक पायऱ्यांच्या विहिरीला (बारव) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यार्थ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून नवसंजीवनी दिली आहे. झाडाझुडपे आणि कचऱ्याने झाकली गेलेली ही प्राचीन विहीर स्वच्छ करून विद्यार्थ्यांनी वणीच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
वणी तालुक्यातील वणी, शिरपूर आणि पळसोनी येथे गोंड राजवटीच्या काळात सुमारे ४०० ते ५०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पायऱ्यांच्या विहिरी आजही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी वणी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रामागे, नगाजी महाराज मंदिराजवळ असलेली ऐतिहासिक बारव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होती. परिसरात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे आणि विहिरीत साचलेल्या कचऱ्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांच्या नजरेआड झाला होता.
सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बारव आल्यानंतर त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. इतिहासप्रेमी विद्यार्थी तत्काळ एकत्र आले आणि श्रमदानाद्वारे विहिरीच्या परिसरातील झाडाझुडपे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. तसेच विहिरीत साचलेला कचरा बाहेर काढून बारव पुन्हा खुली करण्यात आली.
या बारवेच्या भिंतींवर गोंड राजांच्या काळातील ऐतिहासिक खुणा तसेच श्री गणेशासह विविध मूर्तींची सुंदर शिल्पकला आढळून येते. मात्र काळाच्या ओघात ही शिल्पे काही प्रमाणात जीर्ण अवस्थेत पोहोचली आहेत. स्थानिक जाणकारांच्या मते, या विहिरीच्या आतून भुयारी मार्ग चंद्रपूरसह इतर ठिकाणी जोडलेले असल्याच्या आख्यायिकाही प्रचलित आहेत.
या उपक्रमात अमित उपाध्ये, वैभव वाघमारे, अनिकेत बदखल, संदीप गोहोकार, सागर जाधव, अक्षय कवरसे, कपिल राऊत, वैभव मेहता आणि नीरज चौधरी यांनी नियोजनासह प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच अभाविपच्या नगरमंत्री आयुषी पुलेवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या या पुढाकारामुळे वणीच्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला चालना मिळाली असून नागरिकांकडून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वच्छतेनंतर अनेक नागरिक या प्राचीन बारवेला भेट देत असून ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना व्यक्त करत आहेत.

*"वारसा जपला तरच इतिहास जिवंत राहतो" या संदेशाची प्रचिती देणारा हा उपक्रम वणीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला नवी उजळणी देणारा ठरला आहे.*

Post a Comment

Previous Post Next Post