मुंगोली परिसरात देशी कट्ट्यासह संशयित जेरबंद, शिरपूर पोलिसांची धडक कारवाई; पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त

वणी :

यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रांचा वापर व तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शिरपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी बनावटीचा देशी पिस्टल (कट्टा) बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली. आरोपीकडून एक देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, 13 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9.45 वाजताच्या सुमारास शाहरुख गुलशेर खान (वय 31, रा. आमराई वॉर्ड क्र. 2, घुग्घुस, जि. चंद्रपूर) हा मुंगोली खदान परिसरात चोरीच्या उद्देशाने देशी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंगोली ते वर्धा नदी पुलाजवळ सापळा रचला.
संशयास्पद हालचाली करताना आढळलेल्या शाहरुख खान याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला खोचलेला एक गावठी बनावटीचा देशी कट्टा (किंमत 50 हजार रुपये) व दोन जिवंत काडतुसे (किंमत 2 हजार रुपये) आढळून आले. पोलिसांनी तत्काळ मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 व 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पोहेकॉ सुनिल दुबे, पोहवा अविनाश बानकर, पोहवा इकबाल शेख, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे, दिपक वाकडे, किरण दासरवार आणि प्रफुल नाईक यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
अवैध शस्त्रास्त्रांविरोधातील शिरपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post