वणीत आज भव्य मोफत आरोग्य शिबिर, जिल्हा संघटक विजय चोरडिया यांचा पुढाकार; तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषध वाटप

वणी :

शिवसेना नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आज, सोमवार (२९ जून) रोजी वणी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून तसेच लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
जैताई मंदिर परिसरात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात जनरल फिजिशियन, शस्त्रक्रिया, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, स्त्रीरोग व त्वचारोग तज्ज्ञांकडून रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार असून आवश्यक वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, नेत्र तपासणीनंतर पात्र रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरणही करण्यात येणार आहे.
जनसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम हजारो नागरिकांसाठी लाभदायी ठरणार आहे. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित या आरोग्य शिबिराचा वणी, मारेगाव, झरी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post