वणी :
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत कपास क्रांती उत्पादकता अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत वणी तालुक्यातील कुंड्रा, नेरड व पुरड येथील शेतकरी गटांना कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, मंडळ कृषी अधिकारी मनिषा थेरे व उपकृषी अधिकारी प्रकाश खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत कोठारे यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी २० शेतकऱ्यांचा शेतकरी गट स्थापन करण्याचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी गट स्थापन केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर गटाची स्थापना करून शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक लागवड पद्धती, योग्य बियाण्यांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याबरोबरच शेतकरी गटांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा अधिक प्रभावीपणे लाभ घेण्यास मदत होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.