भव्य मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५४५ रुग्णांनी घेतला लाभ, ९३ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड; मोफत औषध व चष्म्यांचे वितरण

वणी :

शिवसेना नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य शिबिर सोमवारी जैताई मंदिर परिसरात उत्साहात व यशस्वीपणे पार पडले.
सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराला वणी, मारेगाव, झरी तसेच परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण ५४५ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९३ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.
जनसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जनरल फिजिशियन, शस्त्रक्रिया, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, स्त्रीरोग तसेच त्वचारोग तज्ज्ञांनी रुग्णांची सखोल तपासणी केली. गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही देण्यात आले. नेत्र तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर येथील डॉक्टर व वैद्यकीय पथकाचा यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी जिल्हा संघटक विजय चोरडिया, सुधाकर गोरे, दीपक कोकास, आशिष खुळसंगे, विनोद मोहितकर, किशोर नांदेकर, उमेश वैरागडे, शुभम गोरे, बाळू चेडे, विशाल किन्हेकर, प्रसाद ठाकरे, हिमांशू बोहरा, राहुल पारखी, संगीता मुरस्कर, मनीषा कोंगरे, वसुधा ढगे, भाग्यश्री वैद्य, प्रणोती बांगडे, सौ. पुरी यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध व्यवस्था सांभाळत शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या आरोग्य शिबिरामुळे शेकडो गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, मोफत औषधे आणि पुढील उपचाराची संधी मिळाल्याने नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post