वणी :
साहित्यप्रेमींना दर्जेदार साहित्यिक उपक्रमांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या विदर्भ साहित्य संघ, शाखा वणीच्या नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी डॉ. अभिजित रमेशराव अणे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
डॉ. अणे यांनी यापूर्वी तब्बल १५ वर्षे शाखेचे सचिव म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा साहित्य संमेलन व विदर्भ साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. तसेच गेल्या ५७ महिन्यांपासून अखंड सुरू असलेली 'माझं गाव माझा वक्ता' ही विक्रमी व्याख्यानमाला ही त्यांच्या संकल्पनेतून व प्रभावी संयोजनातून साकार झालेली महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जाते.
सध्या लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे इंग्रजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अणे यांनी विद्यार्थी विकास विभागामार्फत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. विद्यापीठस्तरीय चमूंचे संयोजक म्हणून उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना दोन वेळा 'कलरकोट' सन्मान प्राप्त झाला आहे.
हिंगणा येथे आयोजित ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनात तसेच वर्धा येथे झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात त्यांनी आमंत्रित वक्ता म्हणून सहभाग नोंदविला आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या सचिवपदाच्या कार्यकाळात २०१७ मध्ये विदर्भ साहित्य संघाच्या उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार वणी शाखेला प्राप्त झाला होता. आता अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली वणी शाखेच्या साहित्यिक उपक्रमांना अधिक व्यापक दिशा मिळेल, असा विश्वास साहित्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.