पाणी विक्री करणाऱ्या गाडी चालकांच्या वाढत्या मुजोरीमुळे नागरिक त्रस्त

वणी :

वणी शहरात पाणी विक्री करणाऱ्या छोट्या वाहन चालकांच्या वाढत्या मुजोरीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या प्रकाराला आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील विविध भागांत पाणी विक्री करणाऱ्या गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या करून पाणी वितरित केले जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तसेच गाडी बाजूला घेण्याची विनंती करणाऱ्या नागरिकांशी चालकांकडून उद्धटपणे वागण्याचे प्रकार वाढल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
वणी शहरात शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक खासगी पाणी प्लांटचा व्यवसाय फोफावला आहे. 10 ते 20 रुपयांत पाणी विक्री करणाऱ्या गाड्या गल्लीबोळांतून फिरून नागरिकांना पाणी पुरवतात. शहरात ठिकठिकाणी 10 रुपयांचे नाणे टाकून 20 लिटर पाणी देणारी ‘पाणी एटीएम’ केंद्रेही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत.
मात्र, या पाणी विक्री करणाऱ्या वाहनांचे चालक ग्राहकांना पाणी देताना गाड्या थेट रस्त्याच्या मधोमध उभ्या करतात. त्यामुळे इतर वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हॉर्न वाजवूनही चालक गाडी बाजूला घेत नसल्याने वाहतूक काही काळ ठप्प होते. उलट “थांबा ना, एवढी काय घाई करता?” अशा शब्दांत चालकांकडून नागरिकांशी उर्मटपणे बोलले जात असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांच्या मते, या प्रकरणात पाणी प्लांट मालकांचा थेट दोष नसला तरी त्यांनी आपल्या चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना देणे आवश्यक आहे. तसेच पोलिस प्रशासनानेही अशा चालकांवर कारवाई करून शिस्त लावावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post