वणी :
उकणी येथील कोळसा खाण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने दुर्घटनास्थळी पाहणी करण्यात आली. यावेळी माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी WCL प्रशासनाला धारेवर धरत दुर्घटनेबाबत जाब विचारला. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर सुरक्षा उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
वणी परिसरात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणींचे जाळे असल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिक व त्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. उकणी व पिंपळगाव गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, उर्वरित जमीन संपादन तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरी देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात आली.
दरम्यान, दुर्घटनेत बाधित झालेल्या खाणकामगार आसुटकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
या प्रसंगी मुख्य महाप्रबंधक खन्ना, उपक्षेत्रीय प्रबंधक स्वामी तसेच WCL प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे, प्रमोदभाऊ वासेकर, राजीव अंकितवार, अशोक चिकटे, विकेश पानघाटे, नंदू आसुटकर, बंडुभाऊ खीरटकर, मनोज खाडे, दादा खेडेकर, सुभाष ढवळे तसेच उकणी परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.