गॅस गळतीमुळे घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक, मानकी येथे रविवारी सकाळी घटना; ३० ते ४० हजारांचे नुकसान

वणी :

तालुक्यातील मानकी येथे घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पती-पत्नीला किरकोळ भाजल्याने उपचार घ्यावे लागले असून सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मारोती कुत्तरमारे यांच्या घरातील महिला सकाळी स्वयंपाक करीत असताना अचानक गॅस सिलिंडरजवळ भडका उडाला. इंडेन गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सिलिंडरचा स्फोट होण्याची भीती निर्माण झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ घराबाहेर धाव घेत स्वतःचा जीव वाचवला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. या आगीत गणेश कुत्तरमारे व त्यांच्या पत्नीला आगीचे चटके बसले. तसेच घरातील संसारोपयोगी वस्तू, कपडे, लाकूडफाटा, टिनपत्रे व इतर साहित्य जळून खाक झाले.
या आगीत गणेश कुत्तरमारे यांचे अंदाजे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post