वणी :
शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांनी संघटन विस्ताराचा ध्यास घेत तालुक्यातील गावागावात शिवसेनेच्या नव्या शाखा स्थापन करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्याच अनुषंगाने वणी तालुक्यातील रासा येथे मंगळवारी (दि. २२ जुलै) शिवसेनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विजय बाबू चोरडिया म्हणाले की, शिवसेनेची विचारधारा तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटन अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. यासाठी वणी तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करून संघटन अधिक मजबूत करण्यात येणार आहे.
तसेच जनतेच्या समस्या तत्परतेने सोडविणे, समाजहिताची कामे प्राधान्याने करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला दीपक कोकास, सुधाकर गोरे, किशोर नांदेकर, प्रसाद ठाकरे, शिवराज पेचे, शुभम गोरे, धीर राजूरकर, राहुल पारखी, हिमांशु बोहरा, अनिल ढगे, अमृत पुरी, कपिल कुंटलवार, प्रज्योत ठावरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.