वणी :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या मालिकेतील युवा संमेलन येथील स्थानिक एस. बी. लॉन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या संमेलनात १६ ते ३५ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिक अशा एकूण १२१ युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत शारीरिक प्रमुख प्रशांतजी दाणी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवकांनी जागरूक राहून देश, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्याग, सेवा आणि समर्पणाची भावना जोपासावी, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावा आणि राष्ट्रकार्याशी जोडले जावे, असे आवाहन केले. चारित्र्यसंपन्न युवकांमध्येच देशाची दशा आणि दिशा बदलण्याचे सामर्थ्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात नगर संघचालक किरण बुजोने यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत संघाच्या पूर्व सरसंघचालकांच्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय जिल्हा कार्यवाह दीपक नवले यांनी करून दिला. युवा संमेलन आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. यावेळी तालुका संघचालक हरिहर भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा व्यवसाय कार्य प्रमुख प्रमोद सप्रे यांनी केले.
सुमारे पाच तास चाललेल्या या संमेलनात शाखा प्रात्यक्षिके, संवाद सत्र, चर्चासत्र, देशभक्तिपर गीत आणि विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. युवकांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. याशिवाय संघाच्या विविध वाद्यांची प्रदर्शनी, पुस्तक प्रदर्शनी तसेच संघाच्या सेवा कार्याची माहिती देणारे फलक उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले.